नंदुरबार ! प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरातील १२ मोर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि.१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता समोर आली. विषयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एका मोराची अवस्था खराब असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात जास्त असल्याने अन्न व पाणी मुबलक असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्यास आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्याअगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते. तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात बागायती क्षेत्र असल्याने व या क्षेत्रात पडीत शेतात मोठमोठे काटेरी झाडे झुडपे आहेत. त्यामुळे या भागात मोरांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. गुरुवारी परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठिकठिकाणी मोरांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांना दिसून आले. तत्काळ वन विभागाला माहिती दिली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अमित जाधव, वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक एम. के. गुजर, नेचर कॉन्सर्व्हशन फोरम या संस्थेचे प्राणीमित्र अभिजित पाटील, प्राणीमित्र योगेश वारुडे, महेश करंकाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यातील एक लांडोर जो अर्धमेला होता त्यावर डॉ. उमेश बारी व गोरे यांनी उपचार केले. पण तो काही वेळानंतर मृत झाला. 6 नर मोर व 7 लांडोर व एक तितूर मृत झाला आहे.