नंदुरबार l प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
वर्ष 2024-2025 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी 60 जागांसाठी लक्षांक प्राप्त झाला असून या जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. यात धडगाव तालुक्यासाठी 22, अक्कलकुवा 20 तर तळोदा तालुक्यासाठी 18 अशा एकूण 60 जागांसाठी निवड करण्यात येईल. धडगाव तालुक्यासाठी 11 मुले व 11 मुली, अक्कलकुवा तालुक्यासाठी 10 मुले 10 मुली व तळोदा तालुक्यासाठी 9 मुले व 9 मुली याप्रमाणे विद्याथ्यांची निवड करण्यात येणार असुन ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैंकी जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणार नाहीत त्यांच्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसंबधी निवडक्रमानुसार आदेश देण्यात येणार आहेत.
ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 11 ते 13 सप्टेंबर 2024 दरम्यान आपले आदेश कार्यालयातून घेवून जावून ज्या शाळेत विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या शाळेत प्रवेश घ्यावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा बदलून मिळणार नाही. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेशासंबंधी कार्यवाही करावी. मुदतीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.
तालुकानिहाय ईश्वरचिठ्ठी निवड प्रक्रीयेची वेळ तळोदा तालुक्यासाठी सकाळी 11 ते 12 वाजता, अक्कलकुवा दुपारी 12 ते 01 तर धडगांव तालुक्यासाठी दुपारी 01 ते 02 वाजेदरम्यान राहील. निवड प्रक्रियेबाबत सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांनी राहतील, असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.