नंदुरबार l प्रतिनिधी-
महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण राज्यात कार्यान्वित केली असून संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालय पुण्याचे आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांसाठी 24 X 7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध असून या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकेल. त्यामुळे बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करावा, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.