नंदुरबार l प्रतिनिधी
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करून आपल्याला गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. त्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या रेल्वे मार्गासाठी मी केलेला पाठपुराव्याला वेळोवेळी प्रतिसाद देणारे केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांचे तसेच केंद्रातील अन्य मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करते. तसेच मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग मंजूर, नवीन खासदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असे आवाहन डॉ. हिना गावित यांनी केला.
नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, 2014 मध्ये मी प्रथमच खासदार बनले तेव्हापासून नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे जे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी, केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिले आणि त्यामुळे माझ्या खासदारकीच्या दोन्ही कार्यकाळात व्यापार शेती उद्योग याला चालना देणारे निर्णय करून घेण्यात मला यश मिळाले. उल्लेखनीय विकास कामं त्यामुळे मी करू शकली.
उधना ते भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागावे, या मार्गावरील रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्या, नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जावे हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनामुळे आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले आदिवासी भागाला याचा मोठा लाभ झाला आता मोदी सरकारच्या त्याच गतिमान कार्यपद्धतीचा आणखी एक मोठा लाभ आपल्याला झाला आहे.
मनमाडपासून मध्यप्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकृतपणे घोषणा करतांना सांगितले आहे की, या प्रकल्पाला पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली असून हा रेल्वे मार्ग प्रकल्प २०२८-२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत ३० नवी रेल्वे स्थानके मनमाड ते इंदूरदरम्यान रेल्वेमार्गावर उभारण्यात येतील. १,००० गावांना आणि ३० लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल असे डॉ.हिना गावित यांनी सांगितले.
*खानदेश ला होईल हा लाभ*
सर्वात महत्त्वाचं असं की, शिरपूर, लौकी आणि सांगवी हे तीन रेल्वे स्थानक या अंतर्गत निर्माण होतील. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक आणि दळणवळण गतिमान बनेल. आपल्या खानदेशातून इंदूर पर्यंत जाणारा मार्ग जलद होईल. धुळे ते इंदूर आणि धुळे ते मनमाड हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यामुळे दिल्ली इंदोर मुंबई सर्वत्र चा प्रवास खानदेशवासीयांना सोपा होईल. या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापार उदीम वाढीस लागून अन्नधान्याची वाहतूक शेती उत्पन्नाचे वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायक होईल.
*मालवाहतूक होणार सुलभ*
नव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर, खते, लोहखनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक • सुलभ होणार आहे. सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल.
तसेच मुंबईपासून इंदूरपर्यतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे.या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढेल. शिवाय महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जाऊन त्या भागातील दळणवळण वाढेल.
या व्यतिरिक्त चे लाभ असे:
* मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे थेट साधन उपलब्ध होईल.
* मनमाड-इंदूरमधील नवीन रेल्वेत मार्गामुळे पर्यटनवाढीलाही मदत.
* श्री महाकालेश्वर ज्योतिलिंग रातील पर्यटनस्थळांना फायदा होईल.
* पीथमपूर ऑटो क्लस्टर हे या रेल्वेमार्गाद्वारे मुंबईजवळील जेएनपीए बंदर व अन्य राज्यांतील बंदराशी जोडले जाईल. पीथमपूर ऑटो क्लस्टरमध्ये ९० मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत.