नंदुरबार l प्रतिनिधी
बम बम भोले,हर हर महादेवाच्या गजर आणि श्री शिवाय नमस्तुभ्यंच्या जय घोषात महादेव मूर्ती आगमनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भर पावसात शिवभक्त चिंब झाले होते. ३ तास चाललेल्या शोभायात्रेत उज्जैन येथील डमरू पथकाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते तर पारंपरिक ढोल ताशे, दफांच्या निनाद व डीजेच्या दणदणाताट संपूर्ण शहर शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला शिवधाम उद्यान साकारण्यात येत असून, त्या ठिकाणी बसवण्यात येत असलेल्या 16 फुटी शिवमूर्तीच्या आगमनानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता मोठा मारुती मंदिरापासून शोभा यात्रा काढण्यात आली. पहाटेपासून कोसळणाऱ्या संततधार पावसातही शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बम बम भोले,हर हर महादेवाच्या गजर आणि श्री शिवाय नमस्तुभ्यंच्या जय घोषात करीत शोभायात्रा मार्गस्थ झाली.
मोठा मारुती मंदिरापासून निघालेली शोभायात्रा स्टेट बँक, अंधारे चौक,आमदार कार्यालय, जुनी नगरपालिका चौक,स्टेशन रोड मार्गे नेहरू पुतळा व तेथून शिवधाम उद्यान पर्यंत नेण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. महादेवांची 16 फुटी मूर्ती क्रेनेद्वारे स्थानापन्न करण्यात आली. शोभा यात्रेत उद्योगपती मनोज रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी यांच्यासह पालिकेचे नगरसेवक,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, गणेश मंडळ, व्यायाम शाळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
महिलांच्या सहभाग
शोभायात्रेत कलशधारी महिलांच्या लक्षणीय सहभाग होता. लहान बालकांपासून तर 75 वर्षांच्या महिलांनी देखील शोभायात्रेत सहभाग घेत शिव आराधना केली. सहभागी युवतींनी ढोल ताशांच्या गजरात लेझीम नृत्य केले त्यांना इतर महिलांनी देखील प्रतिसाद दिला.
शुभायात्रेत फुलांच्या वर्षाव
मोठा मारुती मंदिर पासून १० वाजता सुरुवात झालेली शोभायात्रा दुपारी दोन वाजेला समाप्त झाली. ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये महादेवाच्या मूर्तीवर भाविक भक्तांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.