नंदुरबार l प्रतिनिधी
महायुती सरकारने सहा महिन्यांपूर्वी राज्यातील ५ हजार तांड्यांना महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करुन सर्व तांड्यांसाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची घोषणा करुन तांडा विकासासाठी पाचशे कोटीची तरतूद करुन अध्यादेश काढला होता. परंतू सहा महिने उलटूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी अथवा चालू अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात कुठलाही उल्लेख न आल्यामुळे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे ३१ ऑगस्ट मुक्तीदिनी एक दिवशीय चुलबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी महायुती सरकारने बंजारा समाजासाठी दोन अध्यादेश काढले. एक राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यांना महसुली दर्जा देवून तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करता येणार व त्यासोबत बंजारा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना स्थापन करण्यात आल्याचा अध्यादेश व त्यात तांडा विकासासाठी पाचशे कोटीची तरतुदीचा अध्यादेश सुद्धा त्याचवेळी पारित करण्यात आला. व त्यामध्ये प्रत्येक तांड्याला दरवर्षी तांड्यांच्या विकासासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये वापरता येतील व तांड्यांचा विकास साधता येईल अशाप्रकारचे अध्यादेश महायुती सरकारने काढले होते.
तत्पुर्वी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने अनेकवेळा निवेदने, मोर्चे, आंदोलने वरील मागण्यांसाठी केलेले होते. अलीकडच्या काळात सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील दहा-बारा संघटनेचे प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेवून वरिल विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतू वरिल अध्यादेशाला निघून सहा महिने उलटून गेले तरी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून किंवा इतर कुठल्याही मंत्र्यांकडून अंमलबजावणीची कुठलीही शक्यता दिसत नाही.
एवढेच नाही तर चालू अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात कुठेही संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी एक दमडीचीही तरतुद करण्यात आली नाही. किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत व महसुली दर्जासाठी अडकून पडलेल्या एकाही फाईलीचा निपटारा झालेला नाही. परिणामी फक्त अध्यादेश काढून जर बंजारा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महायुती सरकार करीत असेल तर राज्यातील सव्वा कोटी बंजारा समाज ही गोष्ट कदापी खपवून घेणार नाही किंवा सहन करणार नाही. जर महायुती सरकारने ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यांना महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी हालचाली गतीमान करणार नाहीत व संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलात आणणार नाहीत,
तर अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने ३१ ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यांमध्ये एक दिवशीय चुलबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण, प्रदेश अध्यक्ष मधुकरराव राठोड, मध्यप्रदेश अध्यक्ष संजय राठोड, बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक, मध्यप्रदेशचे सरचिटणीस हुकूम नायक, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय महासचिव शरद राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भुषण पवार, डॉ.साईदास चव्हाण, डॉ.अनिल पवार, बधुलाल राठोड, युवराज चव्हाण, डॉ.गणेश चव्हाण, भावेश पवार, रणजीत चव्हाण, प्रेम चव्हाण, एकनाथ जाधव, किसन पवार, देवा चव्हाण, शिवाजी चव्हाण, चंद्रकांत जाधव व ३२ जिल्ह्यांचे सर्व जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.