नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गुरूकृपा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरटयांनी पाच लाख 64 हजार 300 मुद्देमाल लंपास केला होता.त्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संशयित आरोपी हे महिलांचे कपडे परिधान करून घरपोडी करत असत अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी विधी संघर्ष बालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
नंदुरबार शहरातील विमल प्लाझा कॉम्प्लेक्स मधील गुरूकृपा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरटयांनी 5, लाख 64 हजार 300 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना 5 व 6 जून दरम्यान घडली होती. याप्रकरणी संजय हिरालाल सोनी रा. महाविर कॉलनी बंगला क्र. 16 नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत 14 जून रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकाने नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंप परिसरात संशयित विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले.
त्याच्या पालकांच्या समक्ष त्याची विचारपूस केली असता त्याने नंदुरबार येथील ज्वेलर्सच्या दुकानात त्याच्या साथीदार दिपक ऊर्फ भुत्या भिका पाडवी रा. वाघोदा ता.जि. नंदुरबार याच्या मदतीने महिलांचे कपडे परिधान करुन रात्रीच्यावेळी दागिने चोरी केल्याबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी विधी संघर्ष बालकासह दीपक पाडवी यालाही ताब्यात घेतले.या दोघांनी चोरी केलेला मुद्देमाल नंदुरबार शहरातील नदीम ऊर्फ गोल्डन यास विक्री केल्याचे सांगितले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने शहरातील कुरैशी मोहल्ला परीसरात सदर व्यक्तीचा शोध घेतला असता सदर नदीम शेख ऊर्फ गोल्डन रहीम मेहतर रा. बिस्मील्ला चौक, कुरैशी मोहल्ला, नंदुरबार यास विक्री केल्याचे सांगितले पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोना विशाल नागरे,मोहन ढमढेरे, अभय राजपुत, राकेश मोरे,आनंदा मराठे यांनी केली आहे.