नंदुरबार l प्रतिनिधी
पूर्ववैमनस्यातून तिघा युवकांना मारहाण करण्यात आली.यातउपचारादरम्यान शहादा तालुक्यातील फतेपुर येथील 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.याप्रकरणी 12 संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक आली आहे.
शहादा तालुक्यातील फतेपुर येथील विकास पटले, अनिल वळवी व सावन पवार हे तिघे बुधवार दि. 12 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोटरसायकलने फत्तेपुर येथून आमोदा ते मडकानी दरम्यान रस्त्यावरील नदी काठालगतच्या शिव मंदिराजवळ जात होते. शिव मंदिराजवळ पवन चौधरी, जीवन चौधरी यांच्यासह इतर सात आठ जन बसलेले होते. या सर्वांनी सावन पवार व त्याच्या सोबत असलेल्या दोघांना तुम्ही येथे का आलात, तुम्ही येथे यायचे नाही असे सांगून फायटर, चाकू, लाकडी डेंगारा याच्या साहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्वांनी या तिघांना विनाक्रमांकाच्या बोलेरो वाहनात बसवून मडकानी येथील विकास पवार यांच्या घरासमोरील चौकात सार्वजनिक ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली.
या मारहाणीत सावन पवार (वय 28) याच्या डोक्याला गळ्याला व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने तर इतर दोघांना दुखापत झालेली होती. तिघा जखमींना पोलिसांनी उपचारासाठी म्हसावद रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची परिस्थिती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी तिघांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, सावंत पवार याला गंभीर जखमा झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा 13 जून रोजी सकाळी मृत्यू झाला.
म्हसावद पोलीस ठाण्यात विकास सांगा पटले, रा. फत्तेपुर ता. शहादा याच्या फिर्यादीवरून पवन होमसिंग चौधरी, जीवन होमसिंग चौधरी, मोहन सोमा चौधरी, विकास विष्णू पवार (सर्व रा.मडकानी), संदीप संजय वळवी रा. आमोदा व इतर सात अशा बारा संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी संशयित संदीप संजय वळवी याला पोलिसांनी अटक केली आहे.








