नंदुरबार l प्रतिनिधी
भगवान महावीर का संदेश है जियो और जीने दो… यासह भगवान महावीरांचा जय जयकार करणाऱ्या भक्ती गीतांसह महिला, पुरुष, युवक, युवती मिरवणुकीत गरबा नृत्यासह तल्लीन झाले होते. मिरवणुकी दरम्यान सुमारे 100 फूट लांबीच्या ध्वजाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
याशिवाय अग्रभागी अहिंसेचे प्रतीक असलेला ध्वज तसेच कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या.
विश्व कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची मूर्ती आणि बँडच्या तालावरील भक्ती गीतांनी परिसर दुमदुमून गेला.
नंदुरबार शहर समस्त दिगंबर जैन समाजा तर्फे रविवारी भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या रथावरून भगवान महावीरांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. माणिक चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर तूप बाजार, मंगल भुवन, शिवाजी चौक,जळका बाजार,टिळक रोड, सराफ बाजार, सोनार खुंट, महाराष्ट्र व्यायाम शाळा, हाट दरवाजा, गांधी चौकाला वळसा घालून झुथालाल फर्मच्या प्रांगणात दिगंबर जैन समाज भाविकांनी
भगवान महावीरांच्या मूर्तीची सामूहिक आरती केली. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी आरती आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा हाट दरवाजा, द्वारकाधीश मंदिर चौक, अहिल्यादेवी विहीर परिसर, मार्गे पुन्हा माणिक चौकातील समस्त दिगंबर जैन मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणूक समारोप प्रसंगी माणिक चौकात महावीर जयंतीनिमित्त दिगंबर जैन समाजातर्फे हजारो भाविकांना बुंदीच्या लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावर शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेतर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. दिगंबर जैन समाज सोशल फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष सुरेश जैन आणि नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे महावीर जयंती उत्सवाचे संयोजन करण्यात आले.