शहादा l प्रतिनिधी
परिसरातील शेतकरी सभासद बांधवांच्या साथीनेच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सातपुडा साखर कारखाना व लोकनायक जयप्रकाश सुतगिरणी सध्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहेत.गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनासह वित्तीय संस्थांकडून निधी मंजूरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधितांची थकीत रक्कम आपण देणारच असा विश्वास परिसराचे नेते तथा सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपकभाई पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहविचार सभेच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माधव जंगु पाटील, ईश्वर भुता पाटील, राजाराम इंदास पाटील,रतिलाल रामदास पाटील, रमण बाबू पाटील, रामचंद्र दशरथ पाटील, जिजाबराव पाटील, धनराज पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, अरविंद कुवर, वीरसिंग ठाकरे, उद्धव रामदास पाटील, मोहनभाई चौधरी,नूहभाई नुरानी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, आपली वाटचाल स्वर्गीय अण्णासाहेबांच्या शिकवणीनुसार सुरू आहे. सहकार क्षेत्राला सद्यस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे.साखर कारखाना व सूतगिरणीचे थकीत पेमेंट अदा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून चुकीच्या गोष्टींना कदापिही थारा देणार नाही.अडचणीतून मार्ग काढणारच आणि आपल्या सर्वांच्या साथीने गत वैभव प्राप्त करणार. सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होत असेल तर आपण समझोत्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांपैकी मुकेश पाटील लहान शहादा, किशोर मोरे मंदाणे, जिजाबराव पाटील धमाने, जगदीश पाटील निझर, रघुनाथ पाटील नंदुरबार, नूहभाई नुरानी शहादा, राजाराम इंदास पाटील ब्राह्मणपुरी, महेंद्र पाटील वाका, रतिलाल पाटील पाडळदा, सुभाष पाटील मडकानी, रामदास वाघ सोनवद, गुलाबसिंग गिरासे मोड, ईश्वर भुता पाटील शेल्टी, रामचंद्र पाटील प्रकाश, राजेंद्र वाघ सोनवद, अनिल भामरे मंदाना, मनीष पवार सावखेडा,माधव पाटील पिंगाने यांनी परिसर विकासाचे प्रकल्प सुरू राहावे यासाठी आपण सोबत असून शेतकरी सभासद व या प्रकल्पाशी संबंधित सर्व घटकांचा आर्थिक विकास होण्यासाठी प्रकल्प सुरू राहावे अशी अपेक्षा आपापल्या मनोगतातून व्यक्त केली.
खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, अण्णासाहेब पी.के. पाटील यांचा वारसा समर्थपणे चालवण्यासाठी आपण सक्षम आहोत. आम्ही कधीही स्वार्थासाठी नाते जोडले नाही.खोटे आश्वासन देऊन जनतेला भुलवत ठेवणे आम्हांस मान्य नाही. प्रकल्पांची सद्यस्थिती सर्वांसमोर आहे. थकीत पेमेंट लवकर व्हावे हीच आपली ही भूमिका आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउताराचा परिणाम सूत व्यवसायावर झाला असून आर्थिक संकट असल्याचेही आपणांस मान्य आहे.
विरोधकांनी अशावेळी सहकार्य करण्याऐवजी अपप्रचार सुरू केला आहे. सभासद व जनता त्यांना चोख उत्तर देईल.प्रा.पाटील यांनी थकीत पेमेंटची आकडेवारी सांगून ज्यांचे घेणे नाही तेच अधिक बोलत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.सभेचे सूत्रसंचालन व आभार पालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी.पाटील यांनी केले.