शहादा l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने प्रजाहित रक्षक राजे होते. त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गनिमी काव्याचा अवलंब करत तत्कालीन बलाढ्य इस्लामी सत्तेला जेरीस आणले. अटकेपार स्वराज्याचा झेंडा रोवणाऱ्या शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. या दैदीप्यमान सोहळ्याने हिंदू समाज मनाला जागृतीची प्रेरणा मिळाली व निद्रिस्त हिंदू समाजात चैतन्याची लाट पसरली,असे प्रतिपादन अनुगामी लोकराज्य महाअभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वानंद ओक यांनी केले.
येथील श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषोत्तम व्याख्यानमालेच्या नवव्या वर्षातील “शिवराज्याभिषेक युगप्रवर्तक सोहळा” या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील होते. यावेळी सातपुडा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती कमलताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, अरविंद कुवर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, चेअरमन प्रा.मकरंद पाटील, माजी नगरसेवक के. डी. पाटील, सुपडू खेडकर, ज्ञानेश्वर चौधरी, जयवंत मोरे, मोहनभाई चौधरी प्रकाशा, अनिल भामरे मंदाणे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र रावळ, संचालक मयूरभाई पाटील, गुर्जरी खाद्य संस्कृती ग्रंथाच्या लेखिका माधवी पाटील, माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील,अजय शर्मा शहादा, डॉ. किशोर पाटील सुलतानपूर, गणेशभाई पाटील तीखोरा, अॅड.राजेश कुलकर्णी शहादा, रमाशंकर माळी खेतिया, चंद्रकांत शिवदे शहादा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.ओक सुमारे दोन तासांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात बोलतांना पुढे म्हणाले,निखळ सत्य सांगण्यास इतिहासकार तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी मंडळी घाबरत असते.त्यामुळे आपल्यासमोर आलेल्या इतिहासाचे स्वयं दृष्टीने विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंड आणि तत्पूर्वीच्या सुमारे 900 वर्षांपूर्वीच्या कालखंडाची विस्तृत माहिती देत ते म्हणाले, दि. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे. महाराजांनी तत्कालीन विविध इस्लामी सत्तेच्या विरोधात लढा पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रजाहितदक्ष असलेल्या शिवरायांचे व्यक्तिमत्व उद्दिष्टांबाबत स्पष्ट होते. ध्येयासाठी जे करता येणे शक्य होईल ते सर्व करणार अशी त्यांची भूमिका होती. धर्म स्थानांची विटंबना सहन करणार नाही हे त्यांचे तत्त्व होते. ते हिंदू धर्म रक्षण कर्ते होते,कधीही सेक्युलर नव्हते.त्यांनी बलाढ्य इस्लामी शत्रूला गनिमी काव्याने जेरीस आणले. आक्रमणाचे उत्तर चोखपणे देण्याची शिकवण आणि प्रेरणा शिवरायांनी तत्कालीन समाजाला दिली.शिवाजी महाराजांचे स्वराज्य रयतेच्या रक्षणासाठी होते तर मुसलमानी शाहींचे प्राधान्य जनतेला त्रास देण्याचे होते. सहिष्णू हिंदू समाजमनाला प्रेरित करण्याचे कार्य शिवरायांनी केले.
श्री.ओक यांनी इतिहासातील अफजलखानाचा वध, मिर्झाराजे जयसिंग यांना केलेली विनंती, तुळजापूरच्या भवानी माता मंदिराची तोडफोड, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम,जावळीच्या चंद्रराव मोरे यांची फितुरी, अटकेपार झेंडा, कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीस सन्मानाने परत पाठवण्याचा प्रसंग आदींचे यथोचित वर्णन करत शिवराज्याभिषेकाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले,शिवरायांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने साम्राज्याची ओळख साऱ्या जगाला करून दिली. राज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य करण्यात आल्याने त्याचे वैभव पाहून उपस्थित राजे महाराजे व त्यांचे प्रतिनिधी अचंभित झाले.या सोहळ्याने मनोधैर्य गमावलेल्या हिंदू समाजासाठी आशेचा किरण जागवण्याचे कार्य झाले. या सोहळ्याने समाजमनात चैतन्याची लाट पसरत समाजमन जागृत झाले. इस्लामिक सत्तेला हादरा देण्याची प्रेरणा शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मिळाली आणि म्हणूनच त्याला युगप्रवर्तक सोहळा असे म्हटले जाते,असे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले.