नंदुरबार l प्रतिनिधी-
महिला बचत गटांतील सुमारे 5 हजार महिलांना विविध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आदिवासींप्रमाणेच बिगर आदिवासी महिलांना देखील त्यात प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रीटचा पक्का रस्ता देण्याचे नियोजन आहे; अशी माहिती देतानाच आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी, ज्या गावांना दुष्काळ जाहीर झाला तेथील शेतकरी ग्रामस्थांनी योजनांचा व शासकीय सवलतींचा योग्य लाभ घ्यावा; असे आवाहन केले.
नंदुरबार तालुक्यातील 200 हून अधिक कामांचे आणि शहादा तालुक्यातील 250 हून अधिक कामांसंदर्भातील आदेश पत्राचे वाटप सरपंच उपसरपंच मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार व शहादा येथे पार पडलेल्या त्या कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते.
संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक गावात रस्ते विकास व्हावा, प्रत्येक गावातील पाणी प्रश्न सोडवला जावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि प्रत्येक योजना गावागावात पोचवली आहे.
तथापि मंजूर झालेल्या त्या सर्व विकास कामांची पूर्तता संबंधित प्रत्येक ग्रामपंचायतीने वेळेत करून निधीचा लाभ घ्यावा; असे डॉक्टर सुप्रिया गावित यांनी याप्रसंगी आवाहन केले. भारतीय जनता पार्टीचे केंद्र आणि राज्य सरकार गाव विकासाला प्राधान्य देऊन घरकुल वाटप, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, पक्क्या रस्त्यांची निर्मिती, हर घर नलसे जल यासारख्या विविध योजना राबवत आहे प्रत्येक ग्रामपंचायत ने कागदपत्रांची पूर्तता करून घेत ग्रामस्थांना लाभ करून द्यावा, असे संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या भाषणातून सांगितले.








