नंदूरबार l प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावरुन वेगाने जाणाऱ्या एकता नगर – रेवा या थांबा नसलेल्या एक्स्पे्सने रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर गॅस सिलेंडरसह विविध वेल्डींगचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रॉलीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी २.२५ वाजता नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या एकता नगर-रेेवा एक्स्पे्सचा मोठा अपघात टळला आहे. सदरच्या रेल्वे गाडीला नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे या रेल्वे स्थानकावरुन जात असतांना गाडीचा वेग तासी सुमारे ११० ते १२० कि.मी. होता. रेल्वे जात असल्याचा सिग्नल देखील देण्यात आलेला होता. मात्र तरी ही या ठिकाणी शेडचे काम करणाऱ्या एका कामगाराकडून ट्रॉलीमध्ये गॅस सिलेंडरसह वेल्डींगचे कीट घेऊन ट्रॉली घेऊन जात होता. मात्र ट्रॉली रेल्वे मार्गावर अडकली आणि क्षणार्धात रेल्वे आली अन् गॅस सिलेंडरसह वेल्डींगचे कीट असलेल्या ट्रॉलीला धडक दिल्यानंतर सदरची ट्रॉली चेंडूप्रमाणे दूर फेकली गेली.
दरम्यान, अपघातस्थळी वेल्डींग करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानता राखून वेळीच गॅस सिलेंडर वेळीच बाजूला केल्याने अनर्थ टळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतेही नुकसान झाले नाही. असे असले तरी सदरची बाब गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत असून याची चौकशी होणे देखील गरजेचे आहे.
असे असले तरी सदरची बाब फारशी गांभीर्याने घेण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. काल सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वे पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. स्टेशन मास्तर अमरेंद्र कुमार यांची भेट घेवून माहिती घेतली असता त्यांनी सदरची घटना घडली असली तरी त्यात फारसे नुकसान झालेले नाही. असे असले तरी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. वरिष्ठ पातळीवर याप्रकरणी कळवणार असल्याचेही अमरेंद्र कुमार यांनी सांगितले.