म्हसावद । प्रतिनिधी
समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात “माझी ई शाळा” हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 300 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
माझी ई- शाळा उपक्रमाची सुरुवात शहादा तालुक्यातील मुन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या हस्ते माझी ई- कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश माळी, प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक राकेश आगळे, तालुका समन्वयक सविन पाडवी व प्रशिक्षक म्हणून वैभव डीवरे, 50 शाळांचे शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते.
डॉ. योगेश सावळे यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात गेल्या दीड वर्षात शिक्षण कसे झाले याचा अंदाज आपण सहज लावू शकतो. वर्ग बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले गेले. या काळात राज्यात दीक्षा, झुम, गुगल, व्ह़ॉटसअॅप, युट्यूब, विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. डिजिटल शिक्षण घेणे हा अभ्यासाला पर्याय असू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण डिजिटल शिक्षण सोडले पाहिजे. जेव्हा शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट यासह सर्व सुविधा उपलब्ध होतील, तेव्हा डिजिटलायझेशन वाढेल आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तराप्रमाणे तयार होण्यास मदत होईल. शहादा तालुक्यांतील निवडक 50 शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
जिल्हासमन्वय राकेश आगळे यांनी माझी ई – शाळा या उपक्रमाचे उद्दिष्टे सांगताना स्पष्ट केले की, माझी ई – शाळा या कार्यक्रमाच्या साहाय्याने शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, अध्ययन प्रक्रियेतील आव्हाने तसेच डिजिटल साधने आणि त्यांचा वापर यांमधील दरी कमी करणे, अध्ययन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल साक्षर संसाधने करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील प्रगतीचा स्तर उंचावेल. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययन कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.
प्रशिक्षक वैभव डिवरे यांनी प्रत्यक्ष प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. माझी ई- कार्यशाळा कार्यक्रमासाठी भूमिका आणि जबाबदारी, प्रत्यक्ष डिजिटल साक्षर ऍप व एप्लिकेशन्स मोबाईल फोन आणि अँड्रॉइड टी.व्ही मध्ये कसे इंस्टॉल करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाची सांगता शिक्षक अशोक बागले, गोपाल गावीत, वंदना वाडीले यांनी अभिप्राय नोंदविला.








