नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील मांजरे गाव शिवारातील विहिरीतून गाळ काढत असतांना क्रेनच्या सहाय्याने गाळ वर काढीत असतांना अचानक क्रेन हलल्याने गाळातील दगड डोक्यावर पडून दुखापत झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावा शिवारातील एका शेतात विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु होते. यावेळी मदन चंद्राजी रेगर (वय ३५, रा.राशेड ता.कोठडी जि.भिलवाडा राजस्थान) यांनी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट न घालता गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले. तर क्रेन चालक छोटूलाल चंद्राजी रेगर याने गाळ काढण्यासाठी शिकाई विहिरीत उतरविली होती. शिकाई खालून भरुन वर येत असतांना क्रेन चालक छोटूलाल रेगर याच्याकडून हलगर्जी व निष्काळजीपणाने क्रेन हलल्याने तिच्या भरलेल्या गाळातील दगड मदन रेगर यांच्या डोक्यावर पडून दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत प्रभूलाल नथ्थूजी खाटीक यांच्या फिर्यादीवरुन नंदुराबार तालुका पोलिस ठाण्यात छोटूलाल रेगर याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.








