शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी निशाणी वाटपानंतर शुक्रवारी लोकशाही आघाडीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ जयनगर ता. शहादा येथील स्वयंभू हेरंब गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.

जयनगर ता. शहादा येथील स्वयंभू हेरंब गणेश मंदिरात पॅनल प्रमुख सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, माजी उपसभापती रवींद्र रावल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, ज्येष्ठ नगरसेवक के.डी.पाटील, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत पाटील, जयप्रकाश पाटील,मयूर पाटील, मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे यांच्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना पॅनल प्रमुख दीपक पाटील यांनी म्हटले, शहादा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. कितीही अडचणी व संकटे आली तरी शेतकरी-शेतमजूर-कष्टकरी बांधवांच्या कल्याणासाठी आपण सतत कार्यरत राहू. स्वर्गीय अण्णासाहेबांची थांबला तो संपला ही सूचना डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरू आहे. विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध न करता शेतकरी-शेतमजूर-व्यापाऱ्यांच्या संस्थेत राजकारण आणू नये. आम्ही जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी परिसरातील ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे मतदार-सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार के.डी.पाटील यांनी मानले. दरम्यान, प्रचाराच्या शुभारंभानंतर लोकशाही आघाडीच्या वतीने कहाटूळ,कवठळ, वडाळी, बामखेडा,फेस, कळंबू,तोरखेडा, प्रकाशा,डामरखेडा, काथरदा आदी भागात प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांशी संपर्क साधण्यात आला.विरोधकांच्या अपप्रचाराला मतदार-सभासदांनी बळी न पडता लोकशाही आघाडीलाच साथ द्यावी व लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.








