नंदूरबार l प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची कृष्ण कुंजवर भेट घेतली. यावेळी नंदुरबार तालुक्यातील काकर्दे, निमगाव येथील ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. त्यात नंदुरबार तालुक्यातील काकरदे ग्रामपंचायत मध्ये रेखा राकेश माळी, कला धनसिंग भिल, तर निमगाव ग्रामपंचायत मध्ये सुनील मारवत कोकणी, कमल गांगुर्डे हे निवडुन आले आहेत.
काकरदे ग्रामपंचायत मध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरपंच विराजमान होणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले खाते उघडले आहे. या सर्व विजयी सदस्यांना घेऊन मनसेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख विजय चौधरी, नंदुरबार तालुकाप्रमुख राकेश माळी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून गावविकासाची आणि सर्वसामान्य लोकांची कामे करण्याच्या सूचना दिल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात कार्यकर्ते निर्माण करून पक्ष संघटन वाढविण्यासाठी पदाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.








