नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाड्याच्या जंगलातून काही अज्ञात इसम यांनी चंदन तस्करीच्या प्रयत्न केला. मात्र यावेळी सामाजिक संघटना व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धडक दिल्याचे समजताच ‘पुष्पाराज’ मुद्देमाल घटनास्थळी सोडून पसार झाला. या जंगलात काही चंदनाची झाडे असल्याने वन विभागाने येेथे गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडाच्या जंगलात काही अनोळखी व्यक्ती चंदनाच्या वृक्षांची तोड करत असल्याची माहिती ठाणेपाडा येथे राहणाऱ्या रविंद्र पवार यांनी आदिवासी क्रांतीदल संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर संघटनेचे विरेंद्र अहिरे यांनी याबाबत ठाणेपाडा येथील वनरक्षकांना माहिती दिली. यामुळे वनरक्षक व संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. मात्र वन विभागाचे पथक येत असल्याची भनक चंदन तस्करांना लागली होती.
यामुळे त्यांनी तोडलेली लाकडे घटनास्थळी सोडून पळ काढला. सदरचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. वन विभागाच्या पथकाने चंदन तस्करांचा पाठलाग केला. मात्र ते पसार झाले. दरम्यान, ठाणेपाडा येथील जंगलात प्राण्यांसह मोरांचेही वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे चंदनाचीही वृक्ष आहेत. यामुळे याच्या संवर्धनासाठी या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे.








