नंदूरबार | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या आईच्या दुखद निधनाची बातमी खुद्द पंतप्रधानांनीच आज (दि.३०) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्विट करत दिली. यावेळी त्यांनी हिराबा यांचा एक फोटो शेअर केला असून त्यात म्हटले आहे की, आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं असे म्हटले आहे. तसेच आईच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
दरम्यान, मोदींनी हिराबेन यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा केला होता.हिराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी गांधीनगर येथे झाला होता. तसेच गुजरात निवडणुकीआधी मार्च २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते.








