नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत तिरंगा ध्वज पोचवीण्यासाठी प्रशासनाचे नियोजन असून, त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद आवारात पहिल्या तिरंगा ध्वज वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी सांगितले.
भारत सरकारच्या “हरघर तिरंगा” या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभियानासाठी जिल्हा परिषद आवारात पहिल्या राष्ट्रध्वज वितरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती राम रघुवंशी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती अजित नाईक, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील,
महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पराडके, जान्या पाडवी, जिल्हा परिषद महिला दक्षता समितीचे सदस्य श्रीमती सुलभा महिरे यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या इमारती बाहेर उभारण्यात आलेल्या ध्वज वितरण केंद्राचे फीत कापून जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी उद्घाटन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना राष्ट्रध्वज व बांबूची रोपे देऊन स्वागत केले. भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाकडून दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “हरघर तिरंगा” अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे,
यासाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी तिरंगा ध्वज विक्री व वितरण व्यवस्था केली जात असून, प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा अशा माध्यमातून नागरिकांपर्यंत तिरंगा ध्वज पोचविण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी,
कृषी अधिकारी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन केलेले आहे. यातून ज्यांना हा ध्वज खरेदी करणे शक्य आहे त्यांच्यासाठी विक्री व ज्यांना तो खरेदी करणे शक्य नाही त्यांच्यासाठी मोफत वितरण अशा पद्धतीने राष्ट्रध्वज प्रत्येक घरापर्यंत पोहोचविला जाणार आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन राष्ट्राप्रती आपले प्रेम व राष्ट्रध्वजाप्रती आपला अभिमान व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले.








