नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसिलदार गिरीष वखारे, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प.सदस्य सुहास नाईक, जान्या पाडवी, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, सोमावल लगत 50 गावे जोडलेली असल्याने परिसरातील नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यास चांगल्या आरोग्य सुविधा देता यतील. जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठीद प्रयत्न करता येईल. आरोग्यवर्धिनी केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. परिसरातील पयाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगून कोविडचे संकट अद्यापही पूर्णपणे गेले नसल्याने नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ॲड.पाडवी म्हणाले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.वळवी, आमदार श्री. पाडवी, जिल्हाधिकारी श्रीमती खत्री आणि श्री.गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी 1 कोटी 85 लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.बोडके यांनी दिली.