नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका भरती करतांना आर्थिक व्यवहार करुन चुकीचे निकष लावून भरती प्रक्रिया राबवली असून त्यांची चौकशी करून निलंबित करावे असे निवेदन विधानपरिषदेचे आ.आमश्या पाडवी यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आ. आमश्या पाडवी यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सदर भरती प्रक्रिया राबवितांना येथील बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. मोलाने यांनी वेगवेगळे निकष लावून कर्मचारी भरती प्रक्रिया केली असून एकंदरीत त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे निदर्शनात येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कंकाळा येथे कुंती श्रावण पाडवी यांना १० वी व १२ वी मध्ये कमी गुण असतांना त्या पदवीधर असल्यामुळे त्यांची निवड करून सुनिता सुभाष पाडवी यांना १० वी व १२ वीत वरील उमेदवार पेक्षा जास्त गुण असतांना त्यांना डावलव्यात आले आहे.
तसाच उलट प्रकार देवमोगरा पुनर्वसन अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवितांना झाला आहे. याठिकाणी वसावे झिरू बिज्या व विना मोवाऱ्या वसावे या पदवीधर असतांना त्यांना डावलून त्याठिकाणी १० वी व १२ वीचे गुणांचा निकष लावून भरती प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे.
एकाच तालुक्यात एकाच प्रकल्पात भरती प्रक्रिया राबवितांना दोन वेगवेगळे निकष लावून आर्थिक व्यवहार करून भरती प्रक्रिया राबविण्यात आली असल्याने निदर्शनास आले आहे. तरी आपण चुकीचे निकष लावून आर्थिक व्यवहार करून अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची योग्य ती सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.