नंदुरबार l प्रतिनिधी
दिल्ली येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाला ३६ धावांनी पराभूत करत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघाचा माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दिल्ली टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व एमसीजी क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान एमसीजी क्रिकेट ग्राउंड दिल्ली येथे ७ व्या सिनियर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश, विदर्भ आणि अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेश या संघाला ९६ धावांचे लक्ष देत त्यांचा ३६ धावांनी पराभव करत ७ व्या सिनियर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद चषकावर आपले नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत फिलिप गावित या फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी करत संपूर्ण सीरिजमध्ये १७४ धावा करत उत्कृष्ट फलंदाज हा किताब मिळविला तर सलीम गावित या खेळाडूने आपल्या भेदक गोलंदाजीचा मारा करत एकूण ५ सामन्यात १६ विकेट घेत उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब मिळविला. या विजयी संघात कर्णधार दिनेश भिल, सुनील गावित, अनिल वसावे, सुनील गावित, पंकज वळवी, पियुष गावित, सचिन वसावे, नितीन वसावे, विक्रांत राणा, हरीश कोकणी, शिरीष कोकणी, विशाल कोकणी, संदीप वसावे, सुदाम वसावे, सलीम गावित या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंचा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, अभियंता अनिल पाटील, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पुष्पेन्द्र रघुवंशी, डॉ.मयूर ठाकरे, आदींनी गौरव केला. या विजयी संघाला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.








