निधी अभावी रखडलेली हातोडा पाणी पुरवठा योजनेसाठी तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन ही योजना मार्गी लावण्याची मागणी केली. दरम्यान मंत्री पाटील यांनी पुढच्या महिन्यात नंदुरबार येथे प्रत्यक्ष येणार असून त्यावेळी योजनेची संपूर्ण माहिती घेऊन तातडीने निधी देण्याचे आश्वासन तळोदा शिवसेनेच्या पदाधिकारी यांना दिले.
तळोदा शहराला पाणी पुरवठा करणारी हातोडा पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के झाले आहे. परंतु वेगवेगळ्या भागात नवीन पाईप लाईन , जलकुंभ, व तापी नदी येथे राहिलेल्या किरकोळ कामासाठी ही योजना गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडली आहे. यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे योजनेचे कामही मार्गी लागत नसल्याचे तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निधी साठी बुधवारी राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर तळोदा शहरात काही ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नवीन कुपनलिकांची मागणी ही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी मंत्री पाटील यांनी तळोदा शहराच्या पाणी योजनेसाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची हमी पदाधिकाऱ्यांना दिली एवढेच नव्हे तर पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष नंदुरबार किंवा तळोदा येणार असून तेथे तळोदा शहराची हातोडा पाणी पुरवठा योजनेचे सद्यस्थिती माहिती घेऊन ही योजना कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्र्यांना तळोदा पाणी पूरवठा योजनेचे निवेदन ही देण्यात आले आहे.
सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे,तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सोनार, नितीन ठाकरे, दरम्यान या पदाधिकाऱ्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन तळोदा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
तळोदा शहरातील तापी पाणी पुरवठा ची विस्तारित योजनेसाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी साधारण १३ कोटीच्या प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल केला आहे. परंतु कार्यवाही अभावी हा प्रस्ताव तसाच पडून आहे. त्यासाठी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही दाद मिळत नसल्याची तळोदा शहरवासीयांची व्यथा आहे.निधी अभावी या योजनेचीही घोंगडे भिजत पडले आहे. वास्तविक योजनेचे काम ७० ते ७५ टक्के झाले आहे. हत्ती निघून केवळ शेपूटच उरल्याची स्थिती योजनेची आहे. तरीही निधी साठी लोकप्रतिनिधींही परिपूर्ण दुर्लक्ष केल्याने तळोदा शहरातील लोकांचा नाराजीचा सूर आहे. आधीच शहरातील लोकांना कुपनलिकांचे क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. आता जलशुद्धीकरण प्रकल्प उपलब्ध असतांना केवळ किरकोळ कामामुळे तो ही तसाच धूळखात पडला आहे.