नंदुरबार ! प्रतिनिधी
समाजाशी नाळ जोडलेल्या नंदुरबार तालुका विधायक समिती परिवाराकडून सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुरग्रस्तांना २१ लाखाच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पुराणे अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर,सातारा, सांगली,रायगड जिल्ह्यासह महापूर आल्याने नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून शेकडोवर निष्पाप नागरिकांच्या जीव गेला. शासन प्रशासनाच्या माध्यमातून उपाय योजना करण्यात येत आहेत. परंतु, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नंदुरबार तालुका विधायक समिती कोणत्या परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे ठरविण्यात आले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या पुढाकारातून संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाख रुपयांच्या धनादेश देण्यात आला. मदतीचा धनादेश माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी,नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील उपस्थित होते.
राज्यावर पूर परिस्थितीचे अत्यंत भीषण संकट आहे. संकटाच्या वेळी शासन-प्रशासन धावूनच येईल परंतु आपलीही सामाजिक जबाबदारी आहे मदत करण्याची. पुरात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दुर्देवाने अनेकांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. ज्या-ज्या वेळी संकटे येत असतात त्यात्या वेळी रघुवंशी परिवार व नंदुरबार तालुका विधायक समिती जनतेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासून शिवसेना प्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त नंदुरबार तालुका समितीच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचार्यांना पूरग्रस्तांसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार २१ लाखाचा धनादेश पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे.असे
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले