नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिकण्याची गुणवत्तापूर्ण जोडणी होणार आहे, असे मत मांडत नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग माध्यमिक तसेच नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मध्ये विविध मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कोविड मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 45 दिवसीय सेतू अभ्यासक्रमाबाबत जिल्ह्यातील शिक्षकांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. “दुर्गम भागासाठी सेतू अभ्यासक्रम एक वरदानच असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सेतू सोबत स्थानिक सृजनासह गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हावं”, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी मार्गदर्शन करतांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे यांनी कोविड १९ च्या काळात कृतीपूर्ण आनंददाई वातावरणाची निर्मिती साध्य करणारा अभ्यासक्रम म्हणजे सेतु अभ्यासक्रम असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यास पोहचून त्यांच्या अध्ययनाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
“विपरीत परिस्थितीत १०० टक्के मुलांची पायाभरणी करून गुणवत्तेचा मार्ग खुला करणारा अभ्यासक्रम”, असे मत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या उपसंचालिका डॉ.नेहा बेलसरे यांनी मांडले.”सेतू हा सर्वांनाच मुलांच्या जवळ आणण्याचा मार्ग आहे” असे प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादच्या अधिव्याख्याता श्रीमती नीलोफर पटेल, यांनी सांगितले.
“सेतु म्हणजे आत्मविश्वास” ही गुणवत्तेच्या भाव-बंधाची जोडणी होय”, असे उद्गार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबारचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी काढले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पंचसूत्री या विशेष कार्यक्रमाचे निर्माते श्मच्छिंद्र कदम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला सोप्या पद्धतीने पुढे नेणारी बांधणी म्हणजे सेतू अभ्यासक्रम तसेच मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना गट पद्धतीने, गृहभेटी च्या माध्यमातून, सेतु कृती, स्वाध्याय, योगा उजळणी प्रश्न निर्मिती राज्यस्तरावरील उपक्रम गुणवत्तावाढीसाठी घ्यावेत. सदर ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ केवळ नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनाच नव्हे तर राज्यातील 6174 शिक्षकांना देखील झालेला आहे.
या वेबिनारचे समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरीष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली.विभाग प्रमुख वरीष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.वनमाला पवार यांनी तर आभारप्रदर्शन नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी केले. सोबत मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, सुनिल परदेशी यांचा देखील संयोजनात मोलाचा सहभाग होता.