नंदुरबार l प्रतिनिधी-
“उत्कृष्ट प्रशासक म्हणून मिळालेला हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून, माझ्या प्रत्येक सहकाऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. हा सन्मान मी स्व. बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित करीत आहे,” असे भावनिक प्रतिपादन नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित कोळदे येथील अनुदानित आश्रमशाळेचे प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये शालेय प्रशासनात प्रभावी, शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण कामकाज केल्याबद्दल प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांची प्रकल्पस्तरीय उत्कृष्ट प्रशासक म्हणून निवड करण्यात आली. प्रकल्पाधिकारी डॉ.चंद्रकांत पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण विभाग) नंदकुमार साबळे, किरण मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, विजय सोनार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांनी शैलेंद्र रघुवंशी यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करत “शालेय प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणणारे नेतृत्व” अशी प्रशंसा केली.
सत्काराला उत्तर देताना श्री. रघुवंशी म्हणाले की, “कामाची पावती मिळाल्यावर नवी ऊर्जा मिळते; मात्र त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. पुढील काळात अधिक जोमाने, अधिक गुणवत्तेने काम करावे लागणार आहे. या प्रवासात संस्थेचे, शालेय प्रशासनाचे व सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले आहे.”
या सन्मानाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी तसेच संचालक मंडळाने अभिनंदन केले. दरम्यान, कोळदे येथील अनुदानित आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक आय. एन. चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, माध्यमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला.







