नंदुरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था, भालेर संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल, भालेर ता.नंदुरबार येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण भालेर परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला.
या सोहळ्यास का. वि प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील, सचिव भिका पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत वंदे मातरम् , भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण भालेर परिसर दुमदुमून टाकला.
यानंतर द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल तसेच मागासवर्गीय कन्या छात्रालय येथे माननीय डॉ. विजय बोरसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण भालेरच्या सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई भिल, संस्थेचे हितचिंतक वासुदेव पाटील, शाणाभाऊ पाटील, फकीरा पाटील, शाणाभाऊ धनगर, डॉ. राकेश पाटील, सुनील गंगाराम पाटील, मज्जित दादा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, भालेर-नगाव-तीसी परिसरातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील हे होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला मंगल सुरुवात झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साहित्य कवायत, लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते, आदिवासी व धार्मिक गीते, आदिवासी नृत्यप्रकार, समाजसुधारकांच्या वेशभूषेतील सादरीकरण तसेच चित्रपटगीतांवरील नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः देशभक्तीपर नाटिका व गीतांवरील नृत्य सादरीकरणाने राष्ट्रप्रेम, एकता व संविधानिक मूल्यांची भावना अधिक दृढ केली.
याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांच्या समक्ष नकलमुक्त व प्रामाणिक परीक्षा घेण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रामाणिकपणा हीच खरी यशाची गुरुकिल्ली हा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
तसेच मागासवर्गीय कन्या छात्रालयातील विद्यार्थिनींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या गौरवशाली संविधानाचा व लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवून शिस्त, समता, बंधुता, न्याय व राष्ट्रप्रेम ही मूल्ये आचरणात उतरवणे हेच खरे राष्ट्रकार्य आहे.
विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य व संस्कार यांचा समतोल साधून स्वतःचा व देशाचा उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
संविधानाचा सन्मान राखूया, सशक्त, समृद्ध भारत घडवूया
अशा घोषवाक्यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








