नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथीलके.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताकदिनी पथसंचलनासह भारताचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या पथकांचे सादरीकरण करण्यात आले.
सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, प्रमुख अतिथी माजी पोलीस उपायुक्त शिवलाल वळवी ,संचालिका ईला गावित, सचिव डॉ. विभूती गावित, सचिव ऋषिका गावित व सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य शरद बागुल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांनी प्लाटून निरीक्षण केल्यानंतर सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वात पथसंंचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयवंत चौरे , शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील, एन. आर. निकुम , युवराज जाधव व केंद्रप्रमुख सुरेश तावडे हे उपस्थित होते.
यानंतर विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणाचे. शरद बागुल यांच्या संकल्पनेतून यावर्षी भारताचे सांस्कृतिक वैभव हे विविध राज्यांच्या चालीरीती, पेहराव, आदिवासी संस्कृती दर्शन इत्यादींचा माध्यमातून मांडण्याचे निश्चित करण्यात आले होते व त्यानुसार रॅलीत विविध पथकांनी सहभाग नोंदविला.
रॅलीत कारगिल शौर्यगाथा, ऑपरेशन सिंदूर ,विविध राज्यांच्या संस्कृतींचे प्रदर्शन करणारे पथक , वारकरी संप्रदाय दिंडी, कानुबाईमाता उत्सव,खंडोबा गोंधळ, आदिवासी संस्कृती दर्शन,वराह रुपम्,चित्तथरारक एरियल सिल्क व रोप मल्लखांब प्रात्यक्षिक, ज्युडो कराटे प्रात्यक्षिक, इत्यादी पथकांनी रॅलीत सहभाग नोंदविला.या पथकात शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी राज्य स्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
ऋषिका गावित, डॉ. विभूती गावित यांनी शुभेच्छापर संदेशातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील प्रमुख अतिथी शिवलाल वळवी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध पथकांचा रॅलीचे कौतुक करत उच्च स्तरावरील कार्यक्रमाशी तुलना करत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी शुभेच्छापर संदेशात भारताला सशक्त बनवायचे असेल तर युवकांनी व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे असे आवाहन करत बलशाली भारताचे स्वप्न आपणास पूर्ण करायचे आहे त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले योगदान देणे गरजेचे आहे.”असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
याप्रसंगी के.डी.गावित शैक्षणिक संकुलातील सर्व विद्याशाखांचे प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील व श्रीमती रजनी करेले यांनी केले तर आभार प्राचार्य शरद बागुल यांनी मानले.








