नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा येथील श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सार्थक योगेश पाटील याने डॉ. होमी भाभा फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रोबोक्वेस्ट ऑलिंपियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.
जळगाव येथे पार पडलेल्या खानदेश विभागीय स्तरावरील या स्पर्धेत खानदेशातील विविध शाळांमधून 160 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. रोबोटिक्स, प्रगत कोडींग, इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिक्स या जटिल विषयांवर आधारित या परीक्षेत सार्थकने आपल्या अचूक कोडींग कौशल्य आणि उत्कृष्ट रोबोटिक्स मॉडेलच्या माध्यमातून परीक्षकांना प्रभावित केले.
सातवीत शिक्षण घेणाऱ्या सार्थकने विभागीय फेरीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालक योगेश पाटील व अर्चना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले. सार्थकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. एम. पाटील सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सार्थकच्या या यशामुळे शहादा तालुक्याचे नाव रोबोटिक्स व तंत्रज्ञान क्षेत्रात उज्वल झाले आहे.







