शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चेअरमनपदी अनिल अशोक पाटील (म्हसावद) तर व्हा.चेअरमनपदी शिवदास काशिनाथ चौधरी (बामखेडा त.त.) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक गिरीश महाले यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात पार पडली.यावेळी सहाय्यक अधिकारी घनःश्याम बागल यांची उपस्थिती होती.या निवडीसाठी चेअरमन पदाकरिता अनिल पाटील आणि व्हा. चेअरमन पदाकरिता शिवदास चौधरी यांचे प्रत्येकी एक-एकच अर्ज दाखल झाले होते.
त्यामुळे इतर कोणाचेही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते दीपकभाई पाटील, खरेदी-विक्री संघाचे मावळते चेअरमन प्रा. मकरंद पाटील, शहादा बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, ज्येष्ठ नेते जयप्रकाश पाटील, सूतगिरणीचे व्हा. चेअरमन हरीभाई पाटील,दूध संघाचे माजी चेअरमन उद्धव रामदास पाटील,शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील,खविसंचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, शेतकरी संघटनेचे प्रमुख घनःश्याम चौधरी, रमाकांत संभू पाटील, रवींद्र रावल,अनिल भामरे यांच्यासह लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








