नंदुरबार l प्रतिनिधी-
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था, भालेर संचलित श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा भालेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या रोजगार मेळाव्यास ८९९ युवक-युवतींनी नोंदणी करून सहभाग नोंदवला, त्यापैकी ५४९ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये थेट निवड करण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील १७ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. मंगेश केशव वाघ (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास विभाग, नंदुरबार), दीपक दशरथ पाटील (तालुकाध्यक्ष, भाजपा, नंदुरबार) , चंद्रशेखर पाटील(उपाध्यक्ष) , भिका भाना पाटील (सचीव), आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. मधुकर देसले, महिला महाविद्यालयाचे प्रा. दाऊदखाने, सरपंच प्रा. सौ. कविता चंद्रशेखर पाटील, माजी पर्यवेक्षक पी. पी. बागुल, प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*औद्योगिक कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
कंपनीनिहाय पदे, पात्रता व निवड संख्या पुढीलप्रमाणे :
बांसवाडा गारमेंट्स, दमन (गुजरात) – ७०
लॅगो, जळगाव – ४०
रेमंड, जळगाव – ८०
जे. के. मेटल्स, सिन्नर (नाशिक) – ६०
मंजुश्री, जळगाव – ५०
छत्री इलेक्ट्रिकल, जळगाव – ५०
महिंद्रा अँड महिंद्रा, सातपूर (नाशिक) -३०
हिलाची, जळगाव – २०
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भालेर – CMYKPY Trainee निवड: ७
महिला महाविद्यालय, नंदुरबार – CMYKPY Trainee निवड: ५
श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नवापूर – CMYKPY Trainee निवड: १५
सुप्रीम इक्विपमेंट्स प्रा. लि., नाशिक –२२
डेटा मॅन्युफॅक्चरिंग, नाशिक – २०
संयोग प्रा. लि., नाशिक – २०
सारंग टी. ऑटो, नाशिक – २०
न्यू एनर्जी वाहन, पुणे – २०
सांधी इंटरप्रायझेस, नाशिक -२०
*युवाशक्ती फाउंडेशनचे तर्फे ६५ उमेदवारांची निवड*
युवाशक्ती फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने ८० हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले. फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री. सुधीर अशोक शिरसाठ यांनी ६५ बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेऊन सर्व उमेदवारांची निवड केली. भविष्यातही नोंदणीकृत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
*कौशल्य प्रशिक्षणावर भर*
आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या संचालिका मिस. ज्योती कापडे यांनी युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्रासह रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीसरात यापूर्वी युवकांच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलली जात नव्हती. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे युवकांना नामांकित व मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आयोजक संस्थेचे आभार मानले असून, असे रोजगाराभिमुख उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेच्या रोजगार मेळाव्यामुळे भालेर व पंचक्रोशीतील युवकांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले आहे. थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने अनेक युवकांचे स्वप्न पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागले असून, कुटुंबांच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत. विशेषतः विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर निवडले गेल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास बळावला असून, भविष्यातही असे रोजगाराभिमुख उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावनिक अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








