नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा जि.नंदुरबार या तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वात शिवसेने तर्फे वीज वितरण कंपनीचे शहादा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील यांना देण्यात आले आहे.
शहादा तालुका शिवसेने मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शंभर टक्के आदिवासी समाज वस्ती असणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा या दोन्ही पाड्यात सुमारे शंभर घरे असुन सुमारे एक हजार लोकवस्ती असणारे गावपाडे आहेत.२०२२/२०२३ या वर्षात विद्युतीकरण करणे करिता सर्वेक्षण करण्यात आले होते.परंतु आज पावेतो विद्युतीकरण झालेले नसल्याने आजही आदिवासी समाजाच्या स्थानिक ग्रामस्थांना विजेचा लाभ मिळत नसल्याने अनेक समस्यांसह अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वरील पाड्यात शंभर टक्के ग्रामस्थ हे मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करीत असतात तसेच स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्याने रोजगारासाठी दररोज दिवसा बाहेर गावी जावे लागते.त्यामुळे संध्याकाळी/रात्री घरी परतल्यावर पिण्याचा पाण्यासह पिठाची गिरणी नसल्याने दळण दळण्याकरिता अंधारातच दुसऱ्या पाड्यात जावे लागते.तसेच विद्युतीकरण नसल्याने स्थानिक ठिकाणी स्वतःची शेती असल्यावरही बारमाही पिके घेता येत नसल्याने नाईलाजास्तव रोजगारासाठी दररोज इतर गावात भटकंती करावी लागत आहे.त्याच सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनांसह सर्वंच ग्रामस्थांना विजेची सोय नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा या दोन्ही पाड्यात विजेची सोय नसल्याने संपुर्ण पाड्यात रोज रात्री अंधाराचे साम्राज्य असते.
तरी वरील नमुद सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन शहादा जि.नंदुरबार या तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन द्यावी ही विंनती करण्यात आलेले आहे.
याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन शिवसेनेतर्फे विज वितरण कंपनीचे शहादा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील यांच्यासह उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल यांना देण्यात आले असुन निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल,शिवसेना शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे,शिवसेनेचे जेष्ठ नेते सुपडूभाऊ खेडकर,गीना ठाकरे,जयसिंग ठाकरे,लक्ष्मण पवार,मनोज पाथरवट,भरत ठाकरे,हितेंद्र वर्मा,दाणक्या पाडवी,गुलाबसिंग वसावे,पिंटू खर्डे,योगेश शर्मा,राज्या डूमखेडे,जगदीश ठाकरे,लव लोहार,महेश पाटील,रोशन कोठारी,जुमा पटले गोपाल कोळी,जयसिंग वळवी यांच्या सह्या असुन यावेळी दोन्ही पाड्यावरील ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







