नंदुरबार l प्रतिनीधी
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर पोहून नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने टॉप टेन मध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेत आठवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले असून देव राजपूत हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच मानकरी ठरला आहे.
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण येथील चिवला बीचवर आयोजन करण्यात आले होते. 13 व 14 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह 8 राज्यातील सुमारे 1500 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात 10 किमी, 5 किमी, 3 किमी, 2 किमी, 1 किमी अशा लांबपल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समुद्रात पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत 10 किलोमीटर अंतर पोहणे प्रकारात नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने 14 वर्ष वयोगटात टॉप टेन मध्ये स्थान मिळवत आठवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे त्याने नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिकात भर घातली असून जिल्ह्यातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. त्याने यापूर्वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिक विभागाचे दोनदा प्रतिनीधीत्व केले आहे. जलतरणच्या शॉर्ट इव्हेंट मधील विविध क्रिडा प्रकारात व लाँग इव्हेंटमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. आठवा क्रमांक पटकाविल्या बद्दल देव अभयसिंग राजपूत याचा सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून रोख बक्षिसासह विविध भेटवस्तू पारितोषिक स्वरुपात देण्यात आल्या.
तसेच नंदुरबार येथीलच अक्षरा उमाकांत पाटील हिने पहिल्यांदाच सहभाग नोंदवून 3 किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पुर्ण केले. या यशामुळे दोन्ही जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे स्पर्धकांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे व्यवस्थापक व कोच अमोल भोयर व राहुल काळे, रणजित गावित, अमित गावित यांचे मोलाचे योगदान लाभले.








