नंदुरबार l प्रतिनिधी
अधिकाऱ्यांची मनमानी, रस्त्यांची रखडलेली कामे आणि रस्ते काम झालेले नसताना बिल काढण्याचा प्रकार यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांकडून शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात अक्कलकुवा येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत सूचना केल्यानंतर रखडलेल्या कामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आणि लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
संध्याकाळी सहा वाजता माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी दखल घेऊन तातडीने शासन स्तरावर संपर्क केला, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सूचना केल्या. बेजबाबदार पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावण्यात आले त्यावेळी कार्यकारी अभियंता मयूर वसावे यांनी आंदोलनातील मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अक्कलकुवा उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या आवारात भाजपचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सात तासांनंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, नितेश वळवी, संतोष जैन, दिलीप परदेशी, सुधीर पाडवी, धनसिंग वसावे, जगदीश वळवी, महेश तवर, अमृत चौधरी, सरपंच किसन नाईक, आकाश वसावे, दिलीप वळवी, बबुवा राणा, रोहित शुक्ला आदी उपस्थितीत होते.
या आंदोलनात सरपंच जलसिंग पाडवी उपसरपंच रमेश नाईक, भूषण पाडवी, अशोक पाडवी, रविकांत पाडवी, अमरदीप पाडवी, मनोज पाडवी आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनाची पार्श्वभूमी
अक्कलकुवा सार्वजनिक बांधकामउपविभागीय अभियंता मनमानी कारभार करीत दिनांक ३ मार्च व ९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेली निविदा क्रमांक ४४ राष्ट्रीय महामार्ग ७५३- ब ते शांतीधाम रस्ता बांधकाम करणे तसेच डाब- इराईबारी रस्त्याचे बांधकाम करणे. या निविदा उघडणे बाबत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून या बोली निविदा उघडण्यास चार महिन्यांच्या विलंब झाला असताना देखील त्या उघडण्यात आलेल्या नाहीत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी देखील निविदा उघडण्याबाबत वेळोवेळी कळविले असताना या निविदा उघडण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. तरी राज्य मार्ग – ३ ते डाब इराईबारी रस्त्याची निविदा उघडावी, कोन्यापाडा देवीदेव त्याच्या कामाची डिपॉझिट कंत्राटदारास परत करणे, तसेच खडकापाणी ते पाडवीपाडा रस्ते कामाचे डिपॉझिट कंत्राटदाराला परत करावे, तसेच शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अक्कलकुवा आणि मोलगी विभागातील राष्ट्रीय महामार्ग ७५३-ब ते शांतीधाम रस्त्याची निविदा उघडावीआदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.