जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 ते 05 सप्टेंबर 2025 या कालावधीत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान राबवले जात असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांमार्फत सामुदायिक आरोग्य शिबिरे भरवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
आरोग्य शिबीरांचे आयोजनाच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे, जिल्हा समन्वयक डॉ. योगेश सरताळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राहील पिंजारी, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. नरेश पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मगनसिंग पावरा, महात्मा ज्योतीबा फुले जन-आरोग्य योजनेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, जितेंद्र नाहिरे, डीपीसी-एचएलएलचे रितेश कुमार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आश्विनी जामदार, नगरपालिकेचे सुरेश भालसिंग, देवरास चौरंगे, अविनाश अहिरे तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आरोग्य शिबीरांचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या अभियानात सहभागी होवुन आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे जेणेकरुन जिल्ह्यातील गरजू रुग्णांचा याचा लाभ होईल, अशा सूचना उपस्थितांना दिल्या.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे तसेच जिल्हा समन्वयक डॉ. योगेश सरताळे यांनी यावेळी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाबाबत आवश्यक ती माहिती दिली.