नंदुरबार l प्रतिनिधी
शासन आदेश नसतांना बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती केली आहे अश्या शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर ठोस कारवाईची मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी दि २० ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शाळा शैक्षणिक संस्था यांच्यवर पुढील दोन दिवसात शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्ते नरेंद्र पाटील यांनी इशारा दिला आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्य) यांनी २० ऑगस्ट रोजी उपोषण स्थळी त्यांचे प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्ते यांना पत्र दिले. पत्रात नमूद केले आहे की, शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती केली आहे त्या शाळेचा उल्लेख किंवा पुरावा दिलेला नाही. १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रातिनिधीक मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची सहविचार सभा घेऊन त्यात क्रीडा गणवेश उपक्रम स्थगित करून विद्यार्थी पालक यांना सक्ती करू नये अश्या सुचना सहविचार सभेत देण्यात आल्या असून उपोषण मागे घेणेविषयी पत्रात नमूद केले आहे.
शिक्षणाधिकारी यांनी शाळा स्पॉट विसीट करावी त्यात अनेक शाळांमध्ये एकाच कंपनीचे एक सारखे क्रीडा गणवेश दिसून येतील त्यावर आम्ही पुरावे किंवा शाळांची नावे देण्याची काय गरज आहे? शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की,क्रीडा गणवेश उपक्रम स्थगित करून विद्यार्थी पालक यांना सक्ती करू नये असे म्हटले आहे स्थगित केले याचा अर्थ ते सुरू होते असा होतो व ते आपल्याला माहित आहे म्हणून हिंदु सेवा सहाय्य समितीला नावे व पुरावे देण्याची गरज नाही.
तरी दोषी शैक्षणिक संस्था आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचावर कारवाई करावी या मूळ मागण्या मान्य न झाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी शिक्षण विभागाला लेखी कळविले आहे.
शाळा शैक्षणिक संस्था, मुख्यध्यापक प्राचार्य यांच्यावर कारवाई करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने पुढील दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्ते नरेंद्र पाटील यांनी इशारा दिला आहे.