नंदुरबार जिल्ह्याचा विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पद स्वीकारावं; आ.चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातून दरवर्षी ७ ते ८ लाख मजुरांचे गुजरात आणि देशाच्या इतर भागात रोजगारासाठी स्थलांतर होत असतं. रोजगाराचे निर्मितीचे साधन जिल्ह्यात निर्माण झाले नाहीत. जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली.
विधान परिषद सभागृहात राज्यात झालेल्या विकासाचा सरकारच्या प्रस्तावावर आ.रघुवंशी यांनी पाठिंबा व्यक्त केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद पद स्वीकारले होते. त्यानंतर त्या ठिकाणी झपाट्याने विकास झाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारलेले आहे. त्यामुळेच गडचिरोलीचा विकास होत आहे. जोपर्यंत नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्याचे विकास होणार नाही.जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
परकीय गुंतवणुकीत देशात राज्याच्या प्रथम क्रमांक आहे. राज्याची प्रगती गेल्या तीन वर्षापासून झपाट्याने वाढण्याचे आपण पाहत आहात. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कॉमन मॅनच सरकार आहे अशी ओळख निर्माण केली. मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक राज्यात आली. सर्वसामान्य जनतेला आत्मविश्वास निर्माण झाला की हे सरकार आमच्यासाठी काम करतंय. लोककल्याणाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्या. त्या योजनांच्या माध्यमातून 232 आमदार युतीचे निवडून आले. झपाट्याने विकास होत असताना एकीकडे राज्याच्या काही भागाच्या विकास होत आहे तर काही भागात विकासाच्या अनुशेष भरून निघत नाहीये. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्राचे विकास केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या बॅकलॉग भरून निघण्याचे काम होत आहे.
उद्योगधंद्यांशिवाय विकास अशक्य
आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार जिल्हा राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वात शेवटी आहे. जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाहीयेत. खरं म्हणजे सरकार पाठीमागे उभे राहिले पाहिजे. सरकार पाठीमागे उभे राहिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही हे मान्य केलं आहे. ज्याप्रमाणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचे विकास झाला त्याप्रमाणे आता सरकार गडचिरोली जिल्ह्याच्या मागे भक्कमपणे उभा आहे. त्या ठिकाणी उद्योग निर्मिती होत आहे. नंदुरबार हा देखील जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा असून, दरडोई उत्पन्न अत्यंत अल्प आहे. शासन जिल्ह्यात कुठल्याही उद्योगाला हमी देणार नाही तोपर्यंत उद्योगधंदे उभे राहणार नाहीत आणि जोपर्यंत उद्योगधंदे उभे राहणार नाहीत तोपर्यंत विकास होऊ शकणार नाही असे आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले.
तोरणमाळचा विकासासाठी लक्ष द्या
महाबळेश्वर नंतर राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. आज सापुताऱ्यात काहीही नसतांना गुजरात सरकार त्या ठिकाणी भक्कमपणे उभा आहे. सापुताऱ्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होत असते. त्यामुळे येथे पर्यटक येत असतात. याउलट नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे निसर्गाने सर्व काही दिलं आहे. पण दुर्दैवाने आमचं सरकार आमच्या पाठीशी उभं नाहीये. त्यामुळे तोरणमाळ विकासापासून वंचित असून, शासनाने लक्ष दिले पाहिजे. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तोरणमाळचा विकासासाठी १०० कोटींच्या प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
डीडीसी विभाजनामुळे शेतकऱ्यांना न्याय
आ. चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले,जिल्हा निर्मितीनंतर देखील धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकत्र आहे. केंद्र स्तरावरून काही बँकांचे विभाजन होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँका वेगवेगळ्या आहेत. बँका वेगवेगळ्या झाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. केंद्राचा योजनेमुळे धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे विभाजन होत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल.