आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर साधला निशाणा
नंदुरबार l प्रतिनिधी-
आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे. आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहित आहे. आम्ही योजना मिळवून आणतो हे तक्रारी करून बंद पाडतात; अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला. संबंधित मंत्री महोदयांची बोलणे झाले असून लवकरच आणखी वस्तू वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली.
राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात. पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्रातील युती सरकारने कामगार विभागाकडील नोंदीत कामगारांना विविध खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गतच गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे वितरण केले जात असून गावागावातील ग्रामस्थ संचांचा लाभ घेत आहेत.
दरम्यान दिनांक 14 जून 2025 रोजी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी केलेल्या भाषणात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. डॉक्टर विजयकुमार गावित भाषणात म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात वर्षानुवर्ष गरीब दुर्लक्षित घटक शासकीय योजना आणि सेवा यापासून वंचित होते. मी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम त्या घटकांचे कल्याण करणाऱ्या योजना मी पहिल्यांदा सुरू केल्या.
16000 सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे महत्त्वाचे काम केले होते. त्यानंतर लगेचच संजय गांधी निराधार योजनेतून गावागावातल्या गरीब घटकांना लाभ मिळवून दिले. त्यावेळी सुद्धा आमच्या विरोधकांच्या पोटात दुखले त्यांनी सारख्या तक्रारी करून संजय गांधी निराधार योजनेचे लाभ बंद पाडले. आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे. आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहित आहे. आम्ही योजना मिळवून आणतो हे तक्रारी करून बंद पाडतात.
डॉक्टर हिनाताई गावित खासदार बनल्यानंतर त्यांनी बेघर लोकांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी लागू केलेली घरकुल योजना 2011 च्या नोंदीवर आधारित होती. डॉक्टर हिना गावित यांनी लोकसभेत प्रश्न मांडून ड यादीच्या माध्यमातून साठ हजार हून अधिक लोकांना घरे मिळवून दिले. उज्वला गॅस योजना राबवून दोन लाख महिलांना लाभ दिला. आम्ही गरीब आदिवासींसाठी गाय वाटप, कुकुट पालन शेळ्या वाटप, भांडे वाटप सुरक्षा संच वाटप वगैरे बरेच काही मिळवून दिले.
हे सांगताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर टीका करीत प्रश्न केला की, आमच्या आधी पासून राजकारणात असलेल्या आमच्या विरोधकांनी गरिबांना लाभ देणाऱ्या योजनांचे असे काम का केले नाही? आमच्याप्रमाणे लाभ मिळवून देणारा एक तरी नेता जिल्ह्यात दाखवून द्या; असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील आपल्या भाषणातून शासकीय योजनांची माहिती देत उपस्थित कामगारांचे प्रबोधन केले. याप्रसंगी शेखर पाटील प्रवीण पाटील व अन्य उपस्थित होते.