नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी 100 दिवसांचा विशेष कृती आराखडा तयार करून सर्व विभागांना त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमातील उद्दिष्टानुसार व मार्गदर्शनानुसार, हा आराखडा 15 एप्रिल 2025 पर्यंत राबवला जाईल. या उपक्रमात नागरिकांच्या सेवेसाठी स्वच्छता, सुव्यवस्था, तक्रार निवारण आणि उद्योगांना गुंतवणूक प्रोत्साहन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर दिला आहे.
नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या निर्देशानुसार, शासकीय विभागांनी 100 दिवसांमध्ये (15 एप्रिल 2025 पर्यंत) विविध सुधारणा व गतीशील कामकाजाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या आराखड्यांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडून सुचवण्यात आल्या आहेत. स्वच्छता मोहिमेपासून नागरिकांसाठी जलद आणि परिणामकारक सेवा पुरवण्यापर्यंत, या आराखड्यात अनेक लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे. तक्रारींचे त्वरित निराकरण, गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण तयार करणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांमधील समस्या सोडवण्यावर भर दिला गेला आहे.
हा आराखडा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करून विश्वासार्हता निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ठरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व विभाग प्रमुखांना या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत. 20 जानेवारी 2025 रोजी या कृती आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नमूद केले आहे.
दृष्टिक्षेपात मिशन 100 दिवस…
*🖥️ कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करणे*
• शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे.
• माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत आवश्यक माहिती नागरिकांसाठी संकेतस्थळावर सुलभपणे उपलब्ध करून देणे.
• नागरिकांना त्यांच्या हक्काच्या माहितीसाठी कोणत्याही अडथळ्याविना डिजिटल प्रवेश देणे.
*🧹 स्वच्छता व सुव्यवस्था मोहिम*
• कार्यालये व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम निरंतर राबविण्यात यावी.
• फाईल व्यवस्थापनाचे डिजिटायझेशन व सुरक्षित रेकॉर्ड्स ठेवावे.
• स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.
*🚗 वाहन नियमांचे पालन*
• जुन्या व अनुपयोगी वाहनांवर शासकीय नियमांनुसार निर्लेखनाची कारवाई करावी.
*🏛️ सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी*
• सेवा हमी कायद्यातील तरतुदींनुसार नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याची दक्षता घ्यावी.
• सेवांबाबत विभाग प्रमुखांचा नियमित आढावा घेतला जाणार
*📬 तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा*
• “आपले सरकार” पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी 100 दिवसांत निकाली काढण्यात याव्यात.
• कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर मार्गदर्शक फलक लावावेत.
*🗓️ लोकशाही दिनाचे पालन*
• लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी प्राधान्याने व तातडीने निकाली काढाव्यात.
💼 गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निराकरण*
• जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात
• गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे.
*🏠 क्षेत्रीय भेटी*
• स्थानिक अंगणवाड्या, शाळा, व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन समस्यांचे निराकरण करावे.
• महत्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संवादातून त्यांच्या मर्यादा व अडचणी समजून घ्याव्यात.