शहादा l प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या ‘वन नेशन, वन रेशन’ या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाला कोणत्याही रेशन दुकानातून रेशनचे धान्य सहज घेता येते. याच योजनेचा फायदा घेत जिल्ह्यातील काही ग्राहकांनी अन्य राज्यांतून रेशनचे धान्य घेतले आहे. असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले.
दरम्यान म्हशीच्या दुधातील गाईच्या दुधाची भेसळ ओळखू येऊ नये यासाठी कपड्यांना वापरावयाच्या निळचा वापर केला जात असल्याचा माहिती यावेळी देण्यात आल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. याकडे अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना श्री. मिसाळ यांनी दिली.
शहादा येथील तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिवस कार्यक्रम घेण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ. वी. जमादार, तहसीलदार दीपक गिरासे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक प्रा. डी.सी. पाटील, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य ईश्वर पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष प्रा. आर.ओ. मगरे जिल्हा उपाध्यक्ष कीर्तीकुमार शहा, जिल्हा संघटक वासुदेव माळी, जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उदय निकुंभ, शहादा बस स्थानकचे आगार प्रमुख पी.जी. पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, रेशन दुकानदार संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष अरविंद कुवर, ज्ञानेश्वर चौधरी, युवराज अलकरी, के.डी. गिरासे आदी उपस्थित होते.
श्री. मिसाळ म्हणाले की, जिल्ह्यात ग्राहक हक्काचा सर्वांगीण विचार करून आवश्यक कारवाई आणि काळजी घेतली जाईल. तक्रारी येत असलेल्या भेसळीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ मिळणे आवश्यक आहे. कोणालाही ओटीपी देवू नये. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लुटमार सुरू आहे. नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी क्रमांकाचा फोन आल्यास तो घेतांना काळजी घ्यावी. नंदुरबार जिल्ह्यात एक हजार 81 रेशन दुकानदार असून त्यांचे मार्फत जिल्ह्यातील 13 लाख 45 हजार ग्राहकांना रेशनचे धान्य सुरळीतपणे वितरीत केले जाते. केंद्र शासनाच्या ‘वन नेशन, वन रेशन’ या संकल्पनेतून कोणत्याही नागरिकाला त्याला अपेक्षित असलेल्या रेशन दुकानातून रेशनचे धान्य सहज घेता येते. याच योजनेचा फायदा घेत आपल्या जिल्ह्यातील तीनशे पाच ग्राहकांनी गुजरात व मध्यप्रदेशातून रेशनचे धान्य घेतले आहे तर मध्यप्रदेशातील तिघांनी आपल्या जिल्ह्यातून रेशनचे धान्य घेतले आहे. अन्य विभागातील समस्यांची दाखल घेवून त्या जिल्हा पातळीवरून सोडविल्या जातील असेही श्री. मिसाळ म्हणाले.
प्रा. डी सी पाटील यांनी ग्राहकांच्या समस्या मांडतांना म्हणाले की, शहाद्यात म्हशीच्या दुधात सर्रास गाईच्या दुधाची भेसळ सुरू आहे. ही भेसळ ओळखता येवू नये यासाठी तीत पांढऱ्या कपड्यांना वापरावयाच्या निळ चे द्रावण टाकण्यात येत असल्याने दुधातील भेसळ ओळखू येत नाही. त्याच बरोबर बोगस खवा हा जिल्ह्यासाठी शाप ठरला असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यातून नागरिकांना कॅन्सरचा आजार बळावत आहे. ग्राहकांनी आता मिठाई घेतांना त्यात वापरलेला खव्याची माहिती घेण्याची गरज आहे. शहादा शहरातील खड्डेमुक्त वाहतुकी योग्य रस्ते हा ग्राहकांचा हक्क आहे.
जर ते होणार नसेल तर प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते या रस्त्यांवरील खड्यांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. बस प्रशासनानेही ग्रामीण प्रवाशांच्या सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे. वीज कंपनीकडून वेळेवर मीटर रीडिंग घेतले जात नाही तसेच विलंबाने बिलांचे वाटप केले जात असल्याने ग्राहकांनी विनाकारण आर्थिक भुदांड सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी प्रा. पाटील यांनी केला.
यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व आणि आवश्यकता याची माहिती विषद केली. प्रा. आर.ओ. मगरे, किर्तीकुमार शहा, वासुदेव माळी, अशोक सूर्यवंशी यांची समयोचीत विचार प्रकट केलेत. व्हालंटरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध घोष वाक्य असलेले फलकाद्वारे जनजागृती केली.
कार्यक्रमात शासनाच्या पॉझ मशीनद्वारे धान्य वितारणचे उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील रेशन दुकानदारांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या दालनात ग्राहक जागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, वजन मापे विभाग आणि एल.पी.जी. गॅस कंपनी तर्फे स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी गोकुळ पाटील यांनी केले तर सहाय्यक महसूल अधिकारी हेमंत देवकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, आर.बी. राजपूत, पी.सी. धनगर, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल पाटणकर, भगवान पाटील आदींनी सहकार्य केले.