नंदुरबार l प्रतिनिधी-
बांगलादेश येथे गत काही महिने अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर जे पाशवी अत्याचार केले जात आहेत आणि तेथील शासन अन् प्रशासन ही त्यावर काही कारवाई करण्याऐवजी एक प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे. आता तर तेथील हिंदू नेते, साधू संत यांनाही खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र केले जात आहे. याविरुद्ध बांगलादेशला खडे बोल ऐकवून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे, या मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी यांनी एकत्रितपणे दिले.
या वेळी इस्कॉनचे नंदुरबार जिल्हा प्रमुख माधव शामसुंदर दास, हिंदु जनजागृती समितीचे राहुल मराठे, अविनाश पाटील, मयूर चौधरी, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, आकाश गावित व हर्षल देसाई उपस्थित होते.
या निवेदनात पुढील मागण्या केल्या गेल्या :
१. चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी !
२. हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण: बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
३. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावले उचलावी.
४. बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी.