नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील 9 परीक्षा केंद्रांवर सकाळ सत्रात तर 11 परीक्षा केंद्रांवर दुपार सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पार पडली. पहिल्या पेपर साठी एकूण 3640 उमेदवारांपैकी 3429 उमेदवार हजर तर 211 उमेदवार गैरहजर होते. एकूण 94.20 टक्के विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात परीक्षा दिली. तर दुस-या पेपर साठी एकूण 4212 उमेदवारांपैकी 4002 उमेदवार हजर तर 210 उमेदवार गैरहजर होते. एकूण 95.01 टक्के विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात परीक्षा दिली.
परीक्षेसाठी पेपर सूरु होण्याच्या दिड तास आधीपासून उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर हजर होण्याच्या सूचना परीक्षा परिषदेकडून परीक्षा प्रवेशपत्रात देण्यात आलेल्या होत्या. तरी देखील परीक्षा केंद्रांवर उशिराने आलेल्या उमेदवारांना 10.15 वाजे पर्यंत प्रवेश देण्याची कार्यवाही संबंधीत परीक्षा केंद्रांवर करण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा परिषदेमार्फत प्रत्येक वर्गात तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरात C.C.T.V. लावण्यात आले होते. तसेच या C.C.T.V. चे Live प्रक्षेपण प्राथमिक शिक्षण विभागातील जिल्हा नियंत्रण कक्षात तसेच पुणे येथील राज्य परीक्षा नियंत्रण कक्षात करण्यात आले होते.
उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यापूर्वी परीक्षा प्रवेश पत्रासह मतदानाच्या धर्तीवर आवश्यक असलेले ओळखपत्र सोबत आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रवेशपत्र तपासणी करुन सर्व उमेदवारांचे थंब इंप्रेशन घेऊन त्यानंतर त्यांचे फेस स्कॅनिंग करुन त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला.
परीक्षा कामी प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकाच्या कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी सहाय्यक परिरक्षक म्हणुन शिक्षण विस्तार अधिकारी यांना नियुक्ती देण्यात आली होती. तसेच परीक्षा विषयक गोपनिय साहित्याचे वितरण व संकलन करण्यासाठी झोनल अधिकारी म्हणून योजना उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्रशांत नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परीक्षेचे संनियंत्रण करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य भारती बेलन यांचे भरारीपथक नेमण्यात आले होते. परीक्षेच्या कामकाजाचे संयोजन करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. यात माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, विस्तार अधिकारी शरद पाटील, जयंत चौरे, मंगेश निकुंभ, दिपीका बारी, जी.पी. मगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच गोपनिय साहित्याचे वितरण व संकलन करण्यासाठीचे नियंत्रण राखण्यासाठी जिल्हा परिरक्षक म्हणून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परीक्षेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी एक दिवस आधी पासून राज्यस्तरावरुन पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील उपस्थित होते.
परीक्षेचे कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या अध्यक्ष मिताली सेठी, समितीचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, समिती सदस्य तथा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा परीक्षा नियंत्रक वंदना वळवी, सहनियंत्रक तथा उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, जिल्हा कार्यालयाचे कर्मचारी आसिफ पठाण, योगेश रघुवंशी, मयुर वाणी, स्वप्निल पाटील, महेंद्र अहिरे, विनायक जाधव यांनी परीश्रम घेतले.