नंदुरबार l प्रतिनिधी-
रस्ते गटारी पूल बनवून गाव विकास करणे असो, पाणी प्रकल्प पूर्णत्वास नेणे असो, रोजगार देणे असो सर्व केले ते जनतेला माहित आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तीस वर्षात काय केले? असा प्रश्न करणाऱ्यांनी थोड आमच्या विरोधकांना सुद्धा तपासलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आमच्या प्रमाणे त्यांचं कार्य आहे का? आमच्या विरोधी उमेदवाराने गटार रस्ते वगैरेच्या ठेकेदारीत काय दिवे लावले? ते पण प्रश्न करणाऱ्यांनी समोर ठेवलं पाहिजे. असं असलं तरी आमची जनतेशी बांधिलकी आहे ती कायम ठेवून मी जनसेवेच्या मार्गावर चालत राहील,आमच विकास कार्य चालूच राहील; या शब्दात भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सोनवद, कवठळ त श, लोंढरे, उजळोद, चिरखान, धांद्रे बु., धांद्रे खु., जयनगर, उभादगड, निंभोरा, मातकुट, बोराळे, कहाटुळ आणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते दिपक पाटील,जि.प.बांधकाम सभापती सौ.हेमलता शितोळे,जि.प.सदस्य के.डी.नाईक,भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल,रविंद्र राउळ,प्रशांत चव्हाण,उमेश पाटिल,रामराव बोरसे,संजय भदाणे,तुळशीराम कोळी,सुनील कुवर,कृष्णा कोळी,दिलवर माळचे यांच्यासह परिसरातील सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाषणात पुढे सांगितले की, आपण मला संधी देत आले निवडून देत आले म्हणून आज नंदुरबार जिल्हा विकास पथावर आणता आला. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने आतापर्यंत प्रत्येक घटकाला न्याय देणाऱ्या योजना अमलात आणल्या. देशाची सुरक्षा सांभाळणारा तसेच दलित आदिवासी आणि वंचित घटकांचा अधिकार सुरक्षित ठेवणारा त्याचबरोबर कल्याणकारी योजना देऊ शकणारा पक्ष म्हणजे एकमेव भारतीय जनता पार्टी आहे. आपण पाहिले की मागील अडीच वर्षात आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून काम करताना या पक्षाच्या धोरणांमुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्याला न भूतो न भविष्यती इतका मोठा निधी मिळवून देता आला. कोणत्याही सरकारच्या काळात झाले नाही इतके विकास काम युती सरकारच्या काळात झाले.