नंदुरबार l प्रतिनिधी-
अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर प्रथमच ज्यावेळी आरोग्य राज्य मंत्रि पदवर होतो, तेव्हापासून आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य समस्या संपवणारे काम प्राधान्याने केले. दुर्गम भागापर्यंत आरोग्य यंत्रणा सक्षम केल्यामुळे कुपोषणाने होणारे मृत्यू कमी झाले. या भागातून सक्षम डॉक्टर निर्माण व्हावे यासाठी आपण येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले आणि ताबडतोब त्याच्या उभारणीला गती दिली. आता नंदुरबार येथे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करणे हे आपले उद्दिष्ट आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली.
नंदुरबार विधानसभा मतदार संघातील दुधाळे, भोणे, चौपाळे, अक्राळे, वडबारे, वावद, चाकळे, इंद्रीहट्टी, तलवाडे खु, तिलाली, शनिमांडळ व अन्य गावांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी झंझावाती दौरा करून मतदारांशी संपर्क केला त्या प्रसंगी ते बोलत होते.
त्यांनी या भाषणात पुढे सांगितले की, मागासवर्गीय या शब्दाचा अर्थ कळायला लोकांना वेळ लागला. मी त्यावेळी जवळजवळ 1 लाख 25 हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकलो. ओबीसी आदिवासी भटके विमुक्त वगैरे अशा सर्व संवर्गातील लोकांना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागात नोकरी दिल्या. शिक्षक ग्रामसेवक तलाठी अशा विविध पदांवर तरुणांना रोजगार दिले.
अशा पद्धतीने संधी मिळाली त्या त्यावेळी लोकांना लाभ मिळवून दिला आहे. आतापर्यंत अनेक नेते घडून गेले परंतु बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, दारिद्र्य गरिबी याने ग्रासलेल्या इथल्या वंचित समूहाचा कोणताही विकास झालेला नव्हता. परंतु तीस वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आणून मी विकासाला गती दिली. विविध प्रकारचे पाणी प्रकल्प पूर्णत्वास आणले प्रत्येक गावासाठी रस्ते पाणी विज देण्याबरोबरच शेती विकास करणाऱ्या योजना राबवल्या. केवळ विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार आपण निवडून दिला म्हणून हे घडले.
आताही सर्व मतदारांनी विकास कार्य गतिमान ठेवण्यासाठी जाती धर्मावर आधारित दिल्या जाणाऱ्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.