नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे धडक कारवाया होत आहेत. आतापर्यंत एक देशी कट्टा, 25 तलवारी दोन चाकू, एक गुप्ती, वीस हजार लिटर अवैध दारू, 452 किलो गांजासह 38 वाहने जप्त केली आहेत.
तसेच 16 आंतरराज्य चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान शहादा व मोलगी पोलिसांनी सहा लाख 67 हजाराची रोकड जप्त केली आहे. दरम्यान नंदुरबार येथे तलवार बनवण्याचा कारखान्यावर कारवाई करत 21 तलवारी जप्त केल्या असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
गुजरात,मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरातील 16 आंतरराज्य चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत पोलीस दलाने अवैध दारूच्या जिल्ह्यात 190 केसेस केले असून 36 लाख 81 हजार रुपये किमतीचे वीस हजार लिटर दारू जप्त केली. तसेच जिल्ह्यात शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पाच केसेस केले आहेत.
त्यात 45 लाख तीस हजार रुपये किमतीच्या 452 किलो गांजा जप्त केला आहे. गुटखा वाहतुकीच्या तेरा केसेस करण्यात आले असून सात लाख छत्तीस हजारच्या गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असते. मात्र पोलीस दलातर्फे थातूरमातूर गुटख्यावर कारवाई होते. तसेच म्हसवद पोलीस ठाणे अंतर्गत एक देशी कट्टा ही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 64 लाख रुपये किमतीचे 38 वाहन पोलिसांनी जमा केले. जिल्हाभरात 2200 प्रतिबंधित कारवाई करून एक कोटी 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला आहे. तपासणी दरम्यान शहादा पोलीस तसेच मोलगी पोलिसांनी सहा लाख 67 हजार रुपये रोख पकडले असून याबाबत तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस.यांनी सांगितले.
*नंदुरबार येथे होता तलवार बनवण्याचा कारखाना*
नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी सर्फराज भिकन शाह रा. मण्यार मोहल्ला ह.मु. भोणे फाटा घरकुल, नंदुरबार, फारुक बशीर शाह रा. भोण फाटा घरकुल, नंदुरबार यांना मुद्देमालासह ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला होता. त्यांची विचारपूस केली असता नंदुरबार शहरातील सर्फराज शाह हा त्याच्या भोणे फाटा येथील घरकुलच्या घरामध्ये बेकायदेशीररीत्या धारदार तलवारी व इतर धारदार शस्त्र बनवून विक्री करीत असल्याचे उघड झाले.
सर्फराज शाह याच्या घरात जावून तपासणी केली असता घरामध्ये 10 हजार 500 रुपये किमतीच्या 8 तलवारी व तलवारी बनिवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. तसेच फारुक बशीर शाह रा. भोण फाटा घरकुल, नंदुरबार याच्या घरातून 4 हजार रुपये किमतीच्या 5 तलवारी , शोएब शेख हनीफ रा. घोडापीर मोहल्ला, नंदुरबार याच्या ताब्यातून 5 तलवारी, आकिब रफीक शाह रा. मण्यार मोहल्ला, नंदुरबार याच्या ताब्यातून 2 तलवारी व 1 चाकु, मुस्सवीर शेख अल्लाउद्दीन रा. कुरैशी मोहल्ला नंदुरबार याच्या ताब्यातून 1 तलवार, 1 गुप्ती व 1 चाकु असा 31 हजार 300 रुपये किमतीचे एकुण 21 तलवारी, 1 गुप्ती व 2 चाकु हस्तगत करुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 7 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 31 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सरफराज शहा यांनी बेकायदेशीर रित्या तलवार बनवून विक्री केल्याप्रकरणी सारंखेडा येथील एका अल्पवयीन मुलाकडून तलवार हस्तगत करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.