नंदुरबार l प्रतिनिधी-
भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने कुठल्याही माध्यमातून निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 126 क च्या पोटकलम (1) अंतर्गत प्रदान केलेल्या शक्तीच्या उपकलम (2) मधील तरतूदीनुसार हे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. या कलमाच्या तरतूदीचे उल्लंघन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती दोन वर्षापर्यंच्या कारावासाची किंवा दंड या दोन्ही शिक्षेस पात्र असेल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.