नंदुरबार l प्रतिनिधी-
अत्यंत आकर्षक,खेळाच्या अनुषंगाने सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असणारे नंदुरबार तालुका क्रिडा संकुल शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडू, नागरीकांचे आरोग्य मंदिर बनेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
ते गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसिलदार मिलींद कुलथे, हरिभाई पाटील. जे.एन. पाटील मोहन खानवाणी,प्रा. ईश्वर धामणे, लक्ष्मण माळी, बळवंत निकुंभ, संजय होळकर, संतोष वसईकर, यांच्यासह पुरस्कार प्राप्त क्रिडा प्रशिक्षक,खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह परिसरातील व्यापारी मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबार तालुका क्रिडा संकुलासाठी शासन धोरणाप्रमाणे पाच कोटी तर व्यापारी संकुलासाठी 20 कोटी 17 लाख 23 हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून याठिकाणी एकत्रीत असे जवळपास 25 कोटी रुपये खर्चुन अद्यावत असे तालुका क्रिडा संकुल आणि त्याचे व्यापारी भवन उभे केले जाणार आहे. तालुका क्रिडा संकुलाची जागा चांगली आणि मोक्याच्या ठिकाणावर आहे. मात्र ती अनेक वर्षांपासून उपयोगात आणता आली नाही. आता ती खेळांडूसाठी उपयोगात आणण्याची गरज यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केली.
या ठिकाणच्या संकुलात 200 मीटरच्या अद्यावत ट्रॅकसह, बॅडमिंटनचा हॉल, मुव्हेबल बास्केट बॉलचे कोर्ट, कब्बडी आणि खो-खो साठीचे मैदान देखील तयार करण्यात येणार आहे. यासाठी वास्तुविशारदांनी अतिशय उत्तम आणि आकर्षक इमारतीसह मैदानाचे डियाईन तयार केले आहे. नंदुरबारच्या नागरीकांना याठिकाणी वॉकसाठीची उत्तम सोयदेखील होईल. या क्रिडा संकुलाच्या व्यापारी संकुलात क्रिडा संघटनांसाठी भाडे तत्वावर गाळे देखील उपलब्ध करुन देण्याच मानस असल्याचे यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. नंदुरबार शहरात छत्रपती पुरस्कार विजेत खेळाडू निर्माण करावे लागलीत.
यासाठी क्रिडा शिक्षक आणि क्रिडा प्रेमींना थोडी मेहनत घेण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. व्यापारी बंधुच्या गाळ्याचा प्रश्न देखील रखडला होता. आता तो देखील मार्गी लागल्याने क्रिडा विभागाने तातडीने त्यांच्या समवेत करार करण्याच्या सुचना देखील यांवेळी मंत्र्यांनी दिल्या आहेत.
आगामी काळात याठिकाणी वातानुकूलित इनडोर स्टेडीअम करण्याचा मानस असून त्यासाठी देखील योग्य ती पावले उचलण्यात येतील असे देखील यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले. आदिवासी भागातील विद्यार्थीमध्से क्षमता आणि लवचिकता खुप असते. नेमबाजीत ते अचुक असतात. याच फायदा घेवून खेळाडूंची संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी मेहनतीची गरज देखील डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केली.
तालुका क्रिडा संकुलाप्रमाणेच जिल्हा क्रिडा संकुलात सिंथेटीक ट्रॅक निर्माण करण्याचा मानस असून याठिकाणचा जलतरण तलाव देखील अद्यावत झाला पाहीजे यासाठी पुढच्या कार्यकाळात काम केले जाईल, असे देखील मंत्री डॉ विजयकुमार गावित यावेळी म्हणाले.
तालुका क्रिडा संकुलाच्या माध्यमातून शहारच्या मध्यावर्ती भागात खेळाडूंसाठी चांगली संधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यावेळी बोलताना म्हणाल्या. विद्यार्थी खेळाडूंनी याठिकाणी चांगला सराव केला तर उत्तम शरीरासोबत त्यांना खेळात चांगल्या यशाची खात्री मिळेल. जिल्हा क्रिडा संकुल शहरातील नागरीकांना दुर पडत असल्याने या जवळच्या तालुका क्रिडा संकुलाचा नागरीक आणि खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन यांवेळी त्यांनी खेळाडू आणि विद्यार्थ्य़ांना केले.