नंदुरबार l प्रतिनिधी-
दुर्गम आणि अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 717 आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे आदिवासी गावे आणि वाड्या-पाड्यांचा शाश्वत कायापालट होणार असल्याची माहिती डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.
या अभियानामुळे देशातील 63 हजार तर महाराष्ट्रातील 4 हजार 975 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यामधील आदिवासी बहुल 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार 702 आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. बुधवारी (दि.18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते 02 ऑक्टोबर 2024 रोजी झारखंड राज्यातुन करण्यात येणार आहे.
‘प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम’ अभियानात 17 मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध 25 उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे, असेही डॉ. सेठी यांनी कळविले आहे.
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर पुढील 5 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावांचे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्यांच्या योजनेतुन मॅपिंग केले जाईल. तसेच पोर्टलद्वारे पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे, असे डॉ. मित्ताली सेठी यांनी नमूद केले आहे.
या सुविधा मिळणार..
पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल अॅनिमियाशी लढण्यासाठी केंद्रांची निर्मिती, होम स्टे या सारख्या सुविधा या अभियानांतर्गत सक्षम व शाश्वत केल्या जाणार आहेत, असे डॉ. सेठी यांनी सांगितले.
तालुकानिहाय गावांची संख्या..
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात जिल्ह्यातील तालुकानिहाय अक्कलकुवा 183, अक्राणी 92, तळोदा 89, नंदुरबार 90, नवापुर 148, शहादा 115 गावांचा समावेश असेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.