नंदुरबार l प्रतिनिधी
परमपूज्य सद्गुगुरु विठ्ठल स्वामी महाराज यांनी 200 वर्षांपूर्वी स्थापित केलेल्या नंदनगरीतील श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागील जागेवर भव्य सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे विशेष बाब म्हणून दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केली.
येथील द्वारकाधीश मंदिरात दि. 12 ते 18 सप्टेंबर दरम्यान श्रीमद् भागवत सप्ताह संपन्न झाला. कथा प्रवक्ता, वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत होते. समारोपाच्या दिवशी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित, प्रसिद्ध उद्योजक मनोज रघुवंशी, इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, माजी नगराध्यक्षा इंदुबाई चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, आदी मान्यवरांनी भेट दिली.
श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागे सुमारे दहा हजार स्क्वेअर फुट जागा संस्थानच्या मालकीची असून या जागेवर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी भव्य सभागृह उभारण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस होता. याबाबत संस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज रघुवंशी यांनी मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांना साकडे घातले. त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शासनातर्फे दोन कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्याची घोषणा केली. श्रीमद् भागवत सप्ताहाची यशस्वी सांगता झाली.
भागवत सप्ताह यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव सुहास जानवे तसेच विश्वस्त डॉ. गजानन डांगे, रविशंकर शर्मा, पंडित निकम, अशोक टेंभेकर, चंद्रकांत गंगावणे, शंकरलाल अग्रवाल, जितेंद्र मणिलाल सोनार, आणि सर्व विश्वस्त मंडळ, मंदिराचे पुजारी प्रशांत जानी व सेवेकरी महादू हिरणवाळे, ईश्वर फाळके यांच्यासह असंख्य भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.